पुण्यवंत, नीतिवंत !! जाणता राजा!!!
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. यशवंत, कीर्तिवंत !
सामर्थ्यवंत, वरदवंत !!
पुण्यवं, नीतिवंत, जाणता राजा !!
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता.
निश्चयाचा महामेरू !
बहुत जनांसी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारू !
श्रीमंत योगी !!
अशा साक्षपूर्ण शब्दांत या जाणत्या राजाचे वर्णन समर्थांनी केले आहे. शिवाजी महाराज श्रीमंत तर होतेच; पण योगीही होते. दक्षता, कणखरता आणि तत्परता असा स्थायीभाव असलेल्या शिवछत्रपतींच्या शब्दकोशात आळस नव्हता, उत्साह होता, चंचलता नव्हती, निग्रह होता, मोह नव्हता, ममता होती, भोगवाद नव्हता, त्यागवाद होता. अष्टपैलू, अष्टावधानजागत आदर्श राज्यकर्ता थोर सेनानी लोकहितदक्षधर्माभिमानी; पण परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, असा हा जाणता राजा होता. जगातील थोर पराक्रमी आणि मुत्सद्दी राजांची यादी जर समोर धरली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा मोहरा सापडणे दुर्मिळ आहे. नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस, सिकंदर, किंवा दुसरे कोणतेही नृपती उदाहरणार्थ घेतले तरी प्रत्येक नृपतीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कांकणभर अधिक आहेत आणि हे शतप्रतिशत कबूल करावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराज आपले आहेत म्हणून त्यांना श्रेष्ठ ठरवायचे नसून ते एक ऐतिहासिक सत्य आहे. सर्व नृपती मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थान मिळण्याचे पहिले कारण असे आहे की, त्यांची नीतीमत्ता बलवत्तर होती. मोगल सत्तेने जिकडे तिकडे आपला अंमल बसवला होता व स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रसंग केव्हा येईल, याचा नेम नव्हता. अशा धामधुमीच्या काळामध्ये महाराजांचा जन्म झाला होता. राजांनी हे चित्र स्वराज्यात संपूर्ण बदलून टाकले होते.
महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता, 'वेग', तूफान वेग आणि त्यात हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती. म्हणून महाराजांनी युद्धात हत्ती वापरले नाहीत. सर्व आलमदुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन वाट चोखाळली आणि हत्ती हा प्राणी आणि त्याच्या चाली महाराजांनी गनिमीकावा या युद्धपद्धतीतून वगळून टाकल्या. हेच ते महाराजांचे वेगळेपण. "जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही अन् जे महाराजांनी केले, ते जगाला कधीच करता आले नाही." म्हणून जगाला महाराजांसमोर कायम वाकावे लागते
महाराजांचे जीवन हेच मुळी साहस, रणकौशल्य आणि राजकारणपटुता यांच्या त्रिवेणी संगमवर उभे राहिले होते. छत्रसालासारख्या तरुणाने महाराजांचा आदर्श घेऊन दूर वरती बुंडेलखंडात राज्याची उभारणी केली होती..सर यदूनाथ सरकारांच्या मते, ' कृषकवर्ग' (कुणबी) शिवाजी महाराजांच्या लष्कराच्या पाठीचा कणा होता. लष्करात कुणबी, मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी, मुसलमान, न्हावी, महार, कोळी, भंडारी, रामोशी, धनगर, आगरी, वैगेरे ५६ जातीचे लोक होते. शिवरायांचे सैन्य राष्ट्रीय होते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील सर्व जातीतील गुणवंतांना शिवरायांच्या सैन्यात प्रवेश मिळे. माणसांची पारख करूनच त्यांचा सैन्यात समावेश केला जाई. शिवराय सवडीच्या वेळी, सर्व सैनिकांची स्वत: व्यक्तीगत तपासणी करायचे. सैनिकांना नियमित वेतन व कामगिरीनुसार बक्षिसे, बढत्याही देत. पण कडक शिस्त ठेवण्यासही ते विसरले नाहीत. त्यांनी निष्ठावंत सैनिक निर्माण केले. त्यांच्या सैन्यात, स्वराज्याचे कार्य अभिप्रेत होते. आपल्या स्वत:च्या राज्यासाठी आपण हे लढाईचे कार्य करीत आहोत, ही त्यांच्यात संभावना होती. त्यामुळे शिवरायांनी घालून दिलेल्या सवयी व आदर्श त्यांच्यात भिनलेले होते.
आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराज फक्त आमचेच आहेत, अशी जणू स्पर्धाच लागलेली असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे, पण त्यांच्या विचारांना कृतीत आणणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. आपण शिवचरित्र, महाराजांच्या गुणांना किती आत्मसात केले आहे? महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. आज आपले पुढारी, राज्यकर्ते निर्व्यसनी आहेत का? त्यांनी आखून दिलेली जीवनपद्धती, राबवलेली राज्यपद्धती, यांचा मात्र सपशेल विसर पडलेला आहे. ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी जीवनऊर्जा समर्पित केली, त्यांचे जीवनचरित्र चौकटीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्या चरित्रावर प्राणप्रतिष्ठा करायला हवी. त्यांचे आचार-विचार आंगिकारणे हेच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सव आहेत.
कोणास कधी जहागिरी आगर जमिनी तोडून न देणारे,न्यायाच्या कामात कोणाची भीडमूर्वत न धरणारे, दुष्टांचा काळ, पण गरिबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे, पापभीरू परंतु रणशूर, असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोकांच्या पंक्तीस बसण्यास सर्वथईव पात्र आहेत.
शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष मोठ्या अभिमानाने आपण करतो. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि रोमांचित आठवणींचा जयजयकार करतो. जसा जसा शिवजयंती उत्सव जवळ येत जातो, तस तसे, आपले "डीपी" बदलायला लागतात. शिवजयंतीचा दिवस मावळायला लागतो आणि मागे मात्र अंधार उरतो. उत्सवी सोहळे साजरे करण्यापुरतेच शिवरायांना आपण सीमित ठेवणार आहोत का? याचा विचार करण्याची आता नितांत गरज आहे. कदाचित यातूनच आचार-विचारांचा उष:काल निर्माण होईल, हीच अपेक्षा.
0 टिप्पण्या